मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश रुग्णांसाठी घाटी वरदान ठरली आहे. याठिकाणी दररोज हजारो रुग्णावर उपचार केले जातात. मात्र दाखल होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत घाटीमध्ये पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांची अनेक वेळा हेळसांड होताना पाहायला मिळते. यामुळे या रिक्त जागा भराव्या अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र शासनाकडून चालढकल केली जात असल्याने मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. राज्यभरातील रिक्त असलेली निवासी डॉक्टरांची पदे भरण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने पदे भरण्याचे आश्वासन देत याबाबतचा अध्यादेश काढला. औरंगाबादेत एमबीबीएसच्या २०० विद्यार्थ्यांच्या जागा आहेत. त्यानुसार प्रस्थापित मानकांनुसार १११ वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या ३६ पदे मंजूर आहेत. त्यामुळे नव्याने ७५ निवासी डॉक्टर घाटीला मिळणार असल्याने उत्साह होता. मात्र अद्यापही या रिक्त जागा न भरल्यामुळे राज्यभरातील सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.