खैरेंचा नेम चुकला : नाराजीतही पडले एकाकी!

Foto
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राज्यसभेच्या जागेसाठी आपली वर्णी लागेल या आशेवर असलेल्या खैरे चंद्रकांत खैरे यांचा भ्रमनिरास झाला. मात्र  नाराजी व्यक्त करताना त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधल्याने मिळणारी सहानुभूतीही त्यांना गमवावी लागली. म्हणूनच त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा एकही नेता पुढे आला नाही. अखेर नाराजीतही त्यांच्यावर पडण्याची वेळ आली. काल दिवसभर शिवसेनेच्या एकाही नेत्याने, पदाधिकार्‍याने खैरेंच्या समर्थनार्थ टिप्पणी केली नाही हे विशेष !
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आपला विचार होईल अशी आशा खैरे यांना होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अन् खैरे यांचे नाव मागे पडले. त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवारीसाठी खैरेंनी मोठा जोर लावला. विधानसभा निवडणुकीतील यशाचा दाखला पक्षप्रमुखांना दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक कार्यक्रमात खैरे हेच अग्रभागी राहिले होते. खैरे यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केल्याने खैरे यांची सोय केली जाईल, असे शिवसैनिकांना वाटले. मात्र राज्यसभा उमेदवारीतही खैरे यांचा पत्ता कट झाला.

व्यक्त झाले अन फसले !
 राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदी यांना जाहीर झाल्यानंतर खैरे यांनी नाराजी व्यक्त करीत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचेच नाव घेतल्याने मोठे वादंग निर्माण झाले. त्याच वेळी खैरेंचा नेम चुकल्याचे शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात आले. दोन दिवसात खैरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचा एकही नेता पुढे आला नाही. शहरातील पदाधिकार्‍यांनीही खैरेंच्या समर्थनार्थ प्रसारमाध्यमांत ही कोणीही टिप्पणी केली नाही. थेट आदित्य ठाकरे यांनाच टार्गेट केल्याने त्यांच्यावर एकाकी पडण्याची वेळ आल्याचे बोलले जाते.

समर्थक मात्र अस्वस्थ !
दरम्यान पक्षासाठी  प्रचंड मेहनत करूनही खैरे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने समर्थक अस्वस्थ आहेत. काल दिवसभर जिल्हाभरातील समर्थकांनी खैरेंना भेटण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना भेट मिळाली नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker