राज्यातील राज्यसभेच्या १९ पैकी ७ जागा २ एप्रिल २०२० ला रिक्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांवर लवकरच निवडणूका जाहीर होऊ शकतात. रिक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत तर भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी माझी उमेदवारी निश्चित झाली असल्याचे आश्वासन भाजपतर्फे देण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज दिली. विधानभवनात आज ना रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली.
भाजप आणि आरपीआय ची यूती राज्यात आणि केंद्रात यूती आहे. राष्ट्रीय स्तरावर भाजप च्या नेतृत्वातील एनडीए मध्ये रिपब्लिकन पक्ष सहभागी आहे.केंद्र सरकार मध्ये मंत्री असल्यामुळे माझी राज्यसभे ची उमेदवारी भाजप ने मित्रपक्ष म्हणून निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप तर्फे याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.
तरीदेखील भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, विजया रहाटकर, हंसराज अहिर अशी नावे चर्चेत आहेत. तसेच भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या भूमिकेबाबतही अजून सस्पेन्स कायम आहे. तर काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांना यावेळी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रावादीकडूनही दुसऱ्या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.